पीएचडी करताय? मग मिळवा मासिक ८ हजारांची शिष्यवृत्ती !

गोंडवाना विद्यापीठात अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजना सुरू

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पीएच.डी.नोंदणीकृत संशोधक विद्यार्थ्यांकरिता अधिछात्रवृत्ती योजना (डॉक्टोरल रिसर्च फेलोशिप) लागू करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण १२ विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांना तीन वर्षापर्यंत मासिक ८००० रुपये मिळतील. पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार यांनी केले.

काय आहे ही योजना?

गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करून संशोधन सुरू करणाऱ्या उमेदवारांना गोंडवाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. संशोधन करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना आकर्षित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही शिष्यवृत्ती केवळ पहिल्यांदा डाॅक्टरेट पात्रता प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध राहणार आहे.
विद्यापीठात संशोधन संस्कृतीला चालना देणे किंवा पूर्णवेळ संशोधन अभ्यासकांना प्रवेश देणे, विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांमध्ये संशोधनासाठी प्रतिभा वाढवणेॉ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती वाढीस लावणे यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

कोणाला मिळेल ही शिष्यवृत्ती?
या शिष्यव़ृत्तीसाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्यांचे वय ३० जून रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.पीएच.डी.साठी प्रवेश मिळाल्यापासून १२ महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. ही संशोधन फेलोशिप जास्तीत जास्त ३ वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाईल. या योजनेसाठी अर्ज करावयाची शेवटची तारीख १० मे असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले.