अचानक हृदयविकाराचा झटका आला? या कौशल्याने वाचवा रुग्णाचे प्राण…

सीपीआर प्रशिक्षणासह जनजागृती सुरू

गडचिरोली : बदलती जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सी.पी.आर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले.

आपत्कालीन प्रसंगी रुग्णालयात पोहोचेपर्यंत प्रथमोपचार स्वरूपात सी.पी.आर. देणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सी.पी.आर. प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी 6 टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे. टप्पा 1 मध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, टप्पा 2 मध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, तर टप्पा 3 मध्ये तालुकास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका (टप्पा-4), ग्राम आरोग्य समिती, ग्राम पोषण, स्वच्छता व पाणीपुरवठा समिती सदस्य तसेच सामान्य नागरिक (टप्पा 5), आणि शेवटी विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण (टप्पा 6) होणार आहे.

या व्यापक प्रशिक्षण मोहिमेचा उद्देश म्हणजे गरज भासल्यास कोणतीही सामान्य व्यक्तीही सी.पी.आर. देऊन एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकेल. हा उपक्रम जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोलीअंतर्गत डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सेंटर येथे राबविला जात आहे.