देसाईगंज : सिंचनाची सुविधा असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या अनेक भागात रबी हंगामातील पिकं घेतली जातात. पण रानटी हत्तींच्या कळपाची त्या पिकांवर वक्रदृष्टी पडल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर आहे. चिखली (तुकुम) या गावात २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे हत्तींनी नुकसान केले आहे.
रात्रीच्या वेळी शेतात दाखल होऊन हत्तींचा कळप कोवळ्या धानपिकाला पायदळी तुडवत फस्त करत आहे. यात उन्हाळी हंगामातील धानाचे पऱ्हे, रोवणी झालेले धान, यासोबत कारली, मूग, तुर, टमाटर, वांगी या पिकांची नासधूस होत आहे. वनविभागाने योग्य पद्धतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदु चावला, शहर प्रमुख विकास प्रधान, विभाग प्रमुख भाऊ ठाकरे यांनी चिखली (तुकूम) येथे भेट दिली व नुकसानीची पाहणी केली. काही शेतकऱ्यांनी गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती केली आहे. त्यामुळे आजूबाजुच्या शेतकऱ्यांचे बयान घेऊन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाकडे केली.
याप्रसंगी चिखली (तुकम) येथील पोलिस पाटील कुंदा नाकाडे, धनंजय पर्बते, शेखर नाकाडे, दुर्वास धोटे, उमेश मेश्राम, सुरेश भर्रे, खेमराज गाहाने, विठ्ठल खरकाटे, रुपचंद मेश्राम, अण्णाजी आंबोने, कुमार बुद्धे व गावातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.