दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणार, तहसीलदारांना निवेदन

काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम यांचा इशारा

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम अविकसित बिड्री ग्रामपंचायतअंतर्गत कोंदेवाई, पैमा, गुर्जा ही आदिवासी वस्तीची गावे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वनहक्काच्या प्रकरणासंबंधी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी गावकऱ्यांना घेऊन तहसीलदारांशी चर्चा केली. या आदिवासी गावातील लोकांच्या समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा हकिम यांनी निवेदनातून दिला.

बिड्री ग्रामपंचायत अंतर्गत गावांतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांचे कुटुंब शेती व्यवसायावरच अवलंबून असतात. या गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी आपली वनहक्काची प्रकरणे सन 2012-2013 मध्ये वन समितीमार्फत उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्याकडे सादर केलेली होती. संपूर्ण प्रकरणांची छाननी करून काही प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी रद्द करण्यात आली होती. या त्रुटींमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र आणि वन अतिक्रमण नसल्याचे आढळून आले. त्यानुसार या संपूर्ण शेतकऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र बनवून देण्यात आले. तसेच वन अतिक्रमण पुराव्यासाठी तहसील कार्यालय एटापल्ली येथे गावकऱ्यांसोबत जाऊन या संपूर्ण गावकऱ्यांचे अतिक्रमण पुरावे मिळण्याबाबत तहसीलदार यांच्यासोबत मुस्ताक हकिम यांनी चर्चा केली.

निवेदन देताना गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे मुस्ताक हकिम, राजू उसेंडी, सैनू सिडाम, संजय दलू आत्राम, निलेश गंगावनवार, मंगेश तलांडे, श्यामराव सडमेक, शंकर आत्राम, शामराव पुंगाटी, सुरेश तलांडे, अनिल पुंगाटी इत्यादी गावकरी उपस्थित होते.
(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)