जिल्ह्यात दिड लाख लाडक्या बहिणी झाल्या मासिक दिड हजारांच्या अनुदानासाठी पात्र

विधानसभानिहाय समित्यांत मित्रपक्षांना डच्चू

गडचिरोली : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 56 हजार 267 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 55 हजार 928 अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. हे प्रमाण 99.8 टक्के आहे. त्यातून 1 लाख 50 हजार 185 महिलांचे अर्ज अनुदानासाठी मंजूर करण्यात आले असून येत्या रक्षाबंधनाला त्यांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये (दोन महिन्यांचे) जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर करण्यासाठी विधानसभानिहाय गठीत समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना यात संधी मिळालेली नाही.

राज्य शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी https://ladakibahin. maharashtra.gov. in/signup हे संकेत स्थळ सुरु केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 31 आॅगस्टला संपणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी ज्या महिलांना मोबाईवर संदेश प्राप्त झाले आहेत, त्यांनी त्रुटींची पुर्तता तात्काळ करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणी करून पात्र यादी अंतिम करण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांचे गठन करण्यास जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सांगितले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलेल्या अशासकीय सदस्यांची निवड या समित्यांमध्ये करण्यात आली आहे.

कोण-कोण आहेत समित्यांमध्ये?

अहेरी विधानसभा क्षेत्र : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम (अध्यक्ष), तर रवी ओल्लालवार, विनोद आकलपल्लीवार हे अशासकीय सदस्य, आणि अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व मुलचेरा तालुक्यांचे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे सदस्य, तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव / समन्वयक म्हणून काम पाहतील.

गडचिरोली विधानसभा मतदार संघ : आमदार डॉ.देवराव होळी (अध्यक्ष), प्रशांत वाघरे, गीता हिंगे हे अशासकीय सदस्य तर गडचिरोली, चामोर्शी व धानोराचे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव / समन्वयक म्हणून काम पाहतील.

आरमोरी विधानसभा मतदार संघ : आमदार कृष्णा गजबे (अध्यक्ष), किशन नागदेवे, चांगदेव फाये हे अशासकीय सदस्य तर आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्याचे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव / समन्वयक म्हणून काम पाहतील.

समितीमार्फत आजपर्यंत गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून 59 हजार 660 अर्ज, आरमोरी क्षेत्रातून 54 हजार 921 आणि अहेरी मतदार संघातून 35 हजार 604 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थींची यादी अंतिम केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेमार्फत सदर अर्ज मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.