गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्व्हिस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केले आहे. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरीता सर्व्हिस रोडचे बांधकाम होवू शकलेले नाही. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
 
            
