गडचिरोली-चिमूर मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण? आज ठरणार

भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस, उत्सुकता शिगेला

गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ महायुतीमधील नवीन समिकरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार, की भाजपकडे कायम राहणार याचा फैसला मंगळवारी होणार आहे. भाजपकडे कायम राहिल्यास उमेदवार कोण राहणार याचाही निर्णय मंगळवारी घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघातील तमाम नागरिकांमध्ये याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधून कोण लढणार हे जाणून घेण्यासाठी आणखी एक-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात, म्हणजे 19 एप्रिल रोजी मतदान होणार असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात यावेळी उमेदवारीसाठी चढाओढ निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेस लढविणार आहे. मात्र महायुतीत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी खलबते सुरू आहेत.

भाजपकडून या मतदार संघात हॅट्रिक साधण्याचा विद्यमान खासदार अशोक नेते यांचा मानस आहे. नव्याने राजकीय धडे गिरवत असलेले डॅा.मिलिंद नरोटे यांचेही नाव या स्पर्धेत घुसविण्यात आले आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात ही जागा गेल्यास धर्मरावबाबा आत्राम मैदानात उतरतील. तसेच झाल्यास या मतदार संघातील लढत आणखी चुरशीची होऊ शकते. दिल्लीकरांच्या दरबारी गेलेल्या या समस्येवर आता काय तोडगा निघतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.