गडचिरोली : नागपूर विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ कालबद्ध वेतनश्रेणी लागू करण्याबाबत विभागातील सर्व लेखाधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निर्देश द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक राज्य शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे राज्य कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर आणि जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांनी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना निवेदन देऊन केली.
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयाद्वारे कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू केली. त्यासाठी शिक्षकेतर संघटनांच्या राज्य महामंडळाने प्रयत्न केले होते. राज्यातील काही जिल्ह्यात वेतन निश्चिती थेट लेखाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. परंतु काही वेतन निश्चिती करताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या तक्रार महामंडळाकडे प्राप्त होत आहे. नागपूर विभागात असे प्रकार घडू नये म्हणून त्याबाबतची विनंती उपसंचालक उल्हास नरड यांना करण्यात आली.
याबाबत नुकत्याच झालेल्या कार्यबळ सभेत माहिती दिली असून वेतन श्रेणी तपासून पत्र लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती उपसंचालक उल्हास नरड यांनी महामंडळाचे पदाधिकारी मोरेश्वर वासेकर आणि उदय धकाते यांना दिली.