गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्त्यात बदल करून घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6, 7 आणि 8 स्वीकारतील. दि. 19 ऑगस्टपर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढून 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्र.6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.