गडचिरोली, चामोर्शीतील क्रीडांगणाचा विषय पोहोचला आता क्रीडा मंत्रालयात

अतिक्रमण हटविण्यासाठी मंत्र्यांना साकडे

गडचिरोली : जिल्हा स्टेडिअमसह चामोर्शीतील तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. हे बांधकाम मार्गी लागण्यासाठी तेथील अतिक्रमण तातडीने हटवावे यासह इतर मागण्यांसंदर्भात आ.डॉ. देवराव होळी यांनी क्रीडामंत्री संजय बन्सोडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. त्याला प्रतिसाद देत क्रीडामंत्र्यांनी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आतातरी दोन्ही क्रीडांगणांचा विषय मार्गी लागेल का, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

गडचिरोली जिल्हा स्टेडिअमचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. दोन टप्प्यात हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या ट्रॅकला रद्द करून दुसऱ्या टप्प्यात घेण्यात यावे व दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या स्टेडिअमच्या जागेचा ताबा घेऊन बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता असल्याचे डॅा.होळी यांनी क्रीडा मंत्र्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला गती मिळावी, क्रीडांगणाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून काम सुरू करणे आवश्यक आहे. त्यात कालव्याला लागून संरक्षक भिंत बांधण्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी घेऊन बांधकाम सुरू करण्याकरिता बैठकीचे आयोजन होणे गरजेचे असून त्यात जलसंपदा विभागाच्या सचिवांनाही बोलवावे अशी मागणी पत्राद्वारे आ.होळी यांनी केली आहे.

याकरिता आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आ.डॅा.होळी यांनी केली असता क्रीडामंत्र्यांनी या संदर्भात बैठकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.