13 हजारांवर विद्यार्थी चढणार आज पहिल्या वर्गाची पायरी, स्वागत होणार

जि.प.शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची तयारी

गडचिरोली : यावर्षीच्या नवीन शैक्षणिक सत्राला आजपासून सुरूवात होत आहे. यावर्षी जि.प.च्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत 13 हजार 450 नवीन विद्यार्थी दाखल होणार आहेत. हे विद्यार्थी पहिल्यांदा शाळेची पायरी चढतील. जि.प.च्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाची तयारी करण्यात आली आहे.

अनेक शाळांमध्ये बँडच्या तालावर वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शाळा स्वच्छ करून सजविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक मिळून 1470 शाळा आहेत. याशिवाय 322 खासगी शाळा आहेत. पहिल्याच दिवशी बहुतांश विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शाळा प्रवेशोत्सव ठरल्याप्रमाणे व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विविध स्तरातील अधिकाऱ्यांकडून शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब पवार यांनी सांगितले.