धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

पोलिस भरतीमध्ये अन्याय झाल्याचा आरोप

गडचिरोली : पोलीस शिपाई पदाच्या भरतीत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, यासह इतर मागण्यांकरिता धनगर समाजाच्या पोलिस भरतीतील उमेदवारांनी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण मांडण्यात आले.

त्यात प्रवीण लंबूवार, गणेश देवावार, मोरेश्वर पाटेवार, भारत सिर्गावार, खुशाल मल्लेलवार, भोजराज लांबेवार, जितेंद्र काडीवार, अमोल सिद्धमवार, मल्लेश येग्गावार, निखिल उमलवार, अक्षय मिडपलवार, भोलेश्वर फेबुलवार, राहूल अन्नावार, शुभम सिर्गावार, प्राची मेडेवार हे उमेदवार उपोषणाला बसले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात झाडे कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडे या पोटजातीचा आधार घेऊन नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोटे जात प्रमाणपत्र मिळवले आणि त्या आधारे पोलिस भरतीमध्ये नियुक्ती मिळवल्याचा आरोप सदर उपोषणकर्त्यांनी केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती 2021 व सन 2022 मध्ये 13 बोगस झाडे उमेदवारांची निवड झाली, तर राज्य राखीव पोलीस भरती 2022 मध्ये 5 बोगस उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे खऱ्या भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. गडचिरोली पोलीस भरती 2021 मध्ये नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे, गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे, त्यांचेवर गुन्हे दाखल करून निवड रद्द करण्यात यावी, पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

यावेळी नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ.तुषार मर्लावार, सावलीचे माजी पं.स.सभापती विजय कोरेवार, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष लचसा शिर्गावार, संजय कन्नावार, मुखरूजी ओगेवार, राजाराम उईनवार, क्रिष्णा गंजेवार, राजू कंचावार, राहुल डंकरवार, सुरेश कन्नमवार, बिराजी शिर्गावार, दिलीप कोरेवार, बिराजी मल्लेलवार, शंकर कन्नमवार, प्रभाकर येगडेवार इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.