यंदाही अनेक गावे पूरबाधित क्षेत्रात, मान्सून कालावधीत सतर्कता बाळगा

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यात मान्सून सक्रिय होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळापूर्व नियोजन पूर्ण केले आहे. जिल्ह्यात पूरबाधित गावांची संख्या मोठी असून पुरामुळे मार्ग अडून संपर्क तुटणारी गावेही 200 पेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत पुरामुळे किंवा वीज कोसळून कोणतीही जीवित हाणी होणार नाही यासाठी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्र.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी केले आहे.

मान्सून कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज, मेडीगड्डा बॅरेज तसेच गावानजीकचे छोटे नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील गावांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे त्या गावांतील नागरिकांनी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी.

पर्यटकांनी सेल्फीचा मोह टाळावा, तसेच नदी/नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये. निर्माणाधिन इमारती, मोकळी जागा, किंवा शेतामधील डबके, खड्डे, इत्यादी ठिकाणी लहान मुले खेळण्याच्या ओघात दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता मान्सून काळात अशा ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी. विशेषत: लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.