गडचिरोली : राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठी पोलिस भरती होत असलेल्या गडचिरोलीत बुधवारपासून मैदानी चाचण्यांना सुरूवात झाली. पोलिस विभाग या चाचण्यांसाठी पूर्ण तयारी करून सुसज्ज असताना पूर्वसंध्येला अचानक बरसलेल्या पावसामुळे सर्व तयारीचा विचका झाला. तरीही मैदानी चाचण्या सुरळीतपणे पार पडेल अशी आशा पोलिस विभागाला आहे. संबंधित उमेदवारांचा जीव मात्र या नैसर्गिक संकटाने टांगणीला लागला आहे. असे असले तरी वेळापत्रकात तूर्त कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे रात्री सांगण्यात आले.
रात्री 8.30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने रात्री 10.30 च्या सुमारास उसंत घेतली. त्यामुळे सकाळपर्यंत पावसाचे पाणी सुकून जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण रात्री 12 च्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाला सुरूवात झाली. दरम्यान रात्री पाऊस सुरू होताच 100 मीटर रनिंगचा ट्रॅक ताडपत्र्यांनी झाकण्यात आला. याशिवाय 1600 मीटर रनिंगचा ट्रॅकही झाकण्यात आल्याचे समजते. बुधवारी पहाटेपासून पोलिस शिपाई (चालक) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या चाचण्या सुरू होईल. त्यात उंची, छाती, वजन यासह 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी.धावणे (महिला), तसेच 100 मीटर धावणे, गोळाफेक आदी चाचण्या होणार आहेत.
चालक पदाच्या 10 जागांसाठी 2258 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय पोलिस शिपाई पदाच्या 912 जागांकरिता 24 हजार 570 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
पोलिस अधीक्षकांनी पाहणी करून केल्या सूचना
मंगळवारी संध्याकाळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मुख्यालयात विविध चाचण्यांसाठी केलेल्या तयारीची पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जाणार आहे. जिल्हाभरातील अनेक ठाण्यांचे, उपविभागांचे अधिकारी या भरती प्रक्रियेतील विविध जबाबदारी सांभाळत आहेत.
पुढील पाच दिवस विजांचा कडकडाट
हवामान विभागाने दि.18 ते 22 जूनपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मैदानी चाचण्या सुरू असताना वादळासोबत पुन्हा पाऊस आल्यास उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे काही उमेदवारांनी सदर पोलिस भरतीची प्रक्रिया पावसाच्या दिवसामुळे तूर्त पुढे ढकलावी अशी मागणी अनेक उमेदवारांनी लोकप्रतिनिधींमार्फत शासनाला केली आहे.