गडचिरोली : सर्व प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर विभागात कार्यरत आश्रमशाळा अधीक्षक व अधिक्षिकांच्या विविध सेवाविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या दालनात पार पडली. (सविस्तर बातमी खाली वाचा)
संघटनेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष रोहन जक्कनवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला संघटनेचे राज्य अध्यक्ष राजरत्न पवार यांनी मार्गदर्शन केले. आश्रमशाळा अधीक्षक व अधिक्षिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नागपूर विभागातील सर्व प्रकल्पांचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रकल्पातील अडचणी स्पष्टपणे मांडल्या, ज्यामुळे प्रशासनास वस्तुनिष्ठ माहिती मिळून कार्यवाहीसाठी गती मिळू शकणार आहे.या बैठकीद्वारे प्रशासन व संघटनेदरम्यान संवादाची सकारात्मक दिशा निर्माण झाली आहे.
यावेळी संघटनेचे नागपूर विभागीय सचिव चंद्रकांत कोहपरे, जेष्ठ कार्यकर्ते मुकेश हरडे, महिला प्रतिनिधी भाग्यश्री चिलमवार, वर्धा प्रकल्प अध्यक्ष सोनाली राजुरकर, नागपूर प्रकल्प अध्यक्ष ताई भगत, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष मनीषा सातपुते, तसेच प्रमोद तुलावी, रविंद्र खोब्रागडे, मालन चुधरी, हेमंत टेंभुर्णे, स्नेहा ताडपल्लीवार, शिक्षक नाकतोडे, पल्लवी देवगडे, सपना ठाकरे, हरीष बुरांडे, सचिन नाकाडे, वैशाली डोर्लीकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.