चिमूर : केंद्र शासन पुरस्कृत योजना जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोळणी योजनेचे भूमिपूजन तसेच बगिचासोबत इतर अनेक कामांची सुरूवात खासदार अशोक नेते आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आली. चिमूर क्रांतीदिनी सुरू झालेल्या या विकास कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावातील, शहरातील नागरिकांना भटकंती करावी लागत होती. विहिरी, बोअरवेलद्वारे शुद्ध पाणी मिळत नव्हते, अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेक आजारांचा सामना करावा लागत होता. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजना आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे खा.नेते म्हणाले. जलजीवन मिशनअंतर्गत चिमुर क्रांतीदिनी या क्रांतीभूमीत घरगुती नळ योजनेचा शुभारंभ होतोय ही आनंदायी बाब आहे. चिमुर नगरीच्या विकास कामासाठी सातत्याने माझा प्रयत्न राहील, असे खासदार नेते यांनी याप्रसंगी सांगितले.
आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, आपल्या प्रयत्नाने नगरातील अनेक विकास कामे झाली. या नगरातील वार्डांमध्ये अनेक समस्या होत्या. त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मी हे काम करीत असतो. त्यामुळे मला जनतेच्या रुपाने ऊर्जा व आशीर्वाद मिळतो, असे आ.भांगडिया म्हणाले.
याप्रसंगी चिमूर नगरातील खुल्या जागांचे सौंदर्यीकरण, दुर्गा माता मंदिर व आदर्श कॉलनी वडाळा येथील अंदाजे २४६.४३ लक्ष रुपये निधीतून, तसेच प्रभाग क्र.५ यात्रा मैदान येथे अंदाजे ४४२.१६ लक्ष रुपये निधीतून बगिचा तयार करणे, अशा विविध सौंदर्यीकरण कामांच्या नामफलकांचे अनावरण तसेच कुदळ मारून भूमिपूजन खासदार अशोक नेते व आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम हटवादे, तालुकाध्यक्ष राजू झाडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, ज्येष्ठ नेते दिगांबर खालोरे, ओबीसीचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ थुटे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, युवा नेते बाळू पिसे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंटी वनकर, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरातील नागरिक उपस्थित होते.