2500 विद्यार्थ्यांनी सोडविला तलाठी पदभरती परीक्षेचा सराव पेपर

गडचिरोली पोलिसांचा बेरोजगारांसाठी पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव असतो. या विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत मागे पडतात. त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत त्यांना मार्गदर्शन देणे सुरू केले आहे. याअंतर्गत दि.१६ ला गडचिरोली पोलीस मुख्यालयात, तसेच जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, मदत केंद्रांच्या आवारात उभारलेल्या प्रत्येक वाचनालयात मोफत तलाठी भरतीचा सराव पेपर घेण्यात आला.

‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परिक्षेविषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या सराव पेपरचे आयोजन केले होते. याचा उपयोग तलाठी, वनरक्षक, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे.

जिल्हाभरात २५०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पिपली बुर्गी हद्दीतील १० विद्यार्थ्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतता. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या.

यादरम्यान अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गडचिरोलीत सराव पेपर देणाऱ्या ४५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.