वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीच्या मोजणीसाठी शासनाने दिली मंजुरी

पाच गावच्या बंगाली बांधवांना दिलासा

मुलचेरा : तालुक्यातील बंगालीबहुल भागातील बांधव मागील अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करत उदरनिर्वाह करत आले आहेत. या अतिक्रमित वनजमिनीचे मोजमाप करून सातबारा मिळावा यासाठी शासनाकडे मागणी सुरू होती. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील अतिक्रमणधारकांच्या जमिनीची मोजणी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुलचेरा तालुक्यातील पाच गावात बहुसंख्य बंगाली समाजबांधव वास्तव्याने असून मागील अनेक वर्षापूर्वीपासून त्यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले आहे. मात्र शासनाकडून त्यांना हक्काचा सातबारा मिळाला नाही. संबंधित शेतकऱ्यांद्वारे अतिक्रमित जमिनीचे मोजमाप करून हक्काच्या सातबारा मिळावा, यासाठी प्रशासनस्तरावर निवेदने, अर्ज सादर केले. मात्र त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. ही बाब अतिक्रमित शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचेसमोर मांडली. संबंधितांना हक्काची जमीन मिळावी, यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

या प्रयत्नांना यश आले असून शासनाने बंगाली बांधवांची मागणी मान्य करीत तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची शेतजमिनीची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयामार्फत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी लागणारा खर्च शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील संबंधित 5 गावातील 29 अतिक्रमकधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.