गडचिरोली : माहिती अधिकाराचा गैरवापर करून शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना पैशासाठी वेठीस धरणाऱ्या आंबेशिवणी येथील एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यावर कायदेशिर कारवाई करा, अन्यथा उपोषणाला बसणार असा इशारा उमेश मडावी यांनी दिला आहे.
तक्रारीत नमुद केल्यानुसार, त्या व्यक्तीने माहिती अधिकाराचा गैरवापर करून अनेक शासकीय अधिकाऱ्यांना, विशेषत: वनविभाग, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रस्त केले आहे. माहिती अधिकार, उपोषणाची धमकी देऊन त्याने लक्षावधी रुपये उकळले असल्याचा आरोप केला आहे. वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याकडून जवळपास सात लाख रुपये वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ अधिकारीही त्याच्या धमक्यांना बळी पडत असल्याने त्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्रेक माजविल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे स्वत:चा उत्पन्नाचा स्रोत नसताना अनेक लोकांना सोबत घेऊन तो चारचारी गाडीने फिरतो. हा सर्व खर्च तो कशातून भागवतो याचाही तपास करावा, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.
माहिती अधिकाराचा गैरवापर?
एखादी व्यक्ती सतत सात वेळा माहिती अधिकाराचा वापर करीत असेल तर त्याचा हेतू दुष्ट असल्याचे लक्षात घेऊन कारवाई करावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार आंबेशिवणीतील त्या माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उमेश मडावी यांनी आपल्या तक्रारीतून कळविले.