भर पावसाळ्यात आमचा रोजगार हिरावून उपाशी ठेवू नका

अतिक्रमित व्यवसायिकांचे पर्यायी व्यवस्थेसाठी साकडे, अजय कंकडालवार यांना निवेदन

अजय कंकडालवार यांना आपली व्यथा सांगून निवेदन देताना आलापल्लीतील व्यावसायिक

अहेरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आलापल्ली येथे पक्के बसस्थानक बांधण्यात करण्यात येत आहे. या बस स्थानकामुळे गावाची शोभा वाढण्यासोबत प्रवाशांनाही सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. मात्र बस स्थानकाच्या कृपनलिकेसमोर गेल्या ३५ ते ४० वर्षापासून अतिक्रमण करून छोटा व्यवसाय थाटणाऱ्या गोरगरीब लोकांना तेथून हटण्याची नोटीस बजावण्यात आली. एेन पावसाळ्यात आमचा व्यवसाय बंद करून आमच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आणू नका, अशी विनंती या व्यावसायिकांनी केली आहे. त्यासाठी मदत करण्याची विनंती त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केली आहे.

आलापल्लीतील अनेक छोट्या व्यावसायिकांनी त्या ठिकाणी चपला विक्रीचे दुकान, भोजनालय, फळ दुकाने, चहा टपरी, मोबाईल रिचार्जचे दुकान, जनरल स्टोअर, छोटे कापड दुकान, पान टपरी इत्यादी व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह सुरू केला आहे. हे लोक शासनाने ठरविलेले कर (गृह कर, पाणी कर, गुजरी कर इ.) नियमित आणि वेळोवेळी भरत आहेत. बसस्थानकाच्या कूपनलिकेचे बांधकाम करण्याकरीता समोरील जागेतील व्यावसायिकांना ऐन पावसाळ्यात तेथून दुकान काढून घेण्यासंबंधी महामंडळाच्या अहेरी आगाराने नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्यात आमचे अतिक्रमण काढल्यास आर्थिक टंचाईचा सामना करावा लागून आमच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. बसस्थानकासंबंधी कोणत्याही विकास कामाला आमचा विरोध नाही, पण आम्हाला बेरोजगार न करता अन्य ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती या व्यावसायिकांनी आपल्या निवेदनातून केली.

कूपनलिकेचे बांधकाम करीत असताना बस स्थानकाच्या दोन्ही बाजुला व समोरील मध्यवर्ती भागात दुकान गाळे, चाळ काढली तर त्यामध्ये एसटी महामंडळाचा आर्थिक फायदा होईल. दुकान गाळे, चाळ काढून संबंधित जागेवरील जुन्या व्यावसायिकांना ते गाळे, किंवा व्यवसायिक चाळ कमीत कमी दरामधे मासिक भाडेतत्वावर उपलब्ध करून दिल्यास आमच्यावर बेरोजगारीची व उपासमारीची वेळ येणार नाही, अशी विनंती या व्यावसायिकांनी केली आहे.

या व्यावसायिकांमुळे एसटीच्या प्रवाशांना अधिकच्या सोईसुविधा उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत सर्व व्यवसायिकांना दुसऱ्या जागी व्यवसाय थाटण्यासाठी वेळ देण्यात यावा. आमच्या हलाकीच्या परीस्थितीचा आणि विनंतीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती या व्यावसायिकांनी आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते, माजी जि.प.अध्यक्ष, अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन केली.

पावसाळ्यापर्यंत मुभा द्या
अजय कंकडालवार यांनी अहेरी आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना या छोट्या व्यावसायिकांची समस्या सांगितली. बस स्थानकाचे बांधकाम आताच होत नाही. होईल त्यावेळी दुकानदार आपापले दुकान काढतील, पण पावसाळ्यापुरते त्यांना दुकान तिथेच ठेवण्याची मुभा द्या आणि या समस्येवर काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती कंकडालवार यांनी आगार प्रमुखांना केली.