गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पांढरी भटाड या गावाला लागूनच बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांचा मठ आहे. या मठात माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी पांढरी भटाड, येडानूर, मुरमुरी या गावातील नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.
नेते यांनी देवी शारदेचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील गावातून आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. याप्रसंगी नागरिकांनी पांढरी भटाडच्या मठातील आणि गावातील पाण्याची व्यवस्था, समाज मंदिर, शौचालय, तसेच गावातील 52 लोकांच्या वनहक्क पट्ट्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मांडला.
तसेच येडानूर येथे विद्यार्थ्यांसाठी व गावाच्या नागरिकांसाठी बससेवा नियमित व सुरळीत करावी, मुरमुरी या गावी अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यावर बोलताना अशोक नेते यांनी बँक खात्याला आधार लिंक नसणे, खात्यातील रकमेचा व्यवहार न करणे, अशी अनेक छोटीमोठी कारणे त्यामागे असल्याचे सांगत महिला भगिनींनी निराश न होता आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा. सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळेल. त्यांना कुणीही लाभापासून वंचित ठेवू शकत नाही, असे सांगत पांढरी भटाड, येडानूर, मुरमुरी या गावातील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किशोर पवार, गंगाराम महाराज, रामदास चव्हाण, हरिचंद जाधव, बाबुराव राठोड, प्रेमसिंग पवार, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.