गडचिरोली : शासकीय आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन नोंदणीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत नोंदणी करायची होती. पण अजूनही काही शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी ही शेवटची संधी असण्याची शक्यता आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचा धान येऊ नये यासाठी सातबाराच्या आधारावर नोंदणी करून त्याच शेतकऱ्यांचा धान शासकीय खरेदी केंद्रांवर स्वीकारला जात आहे. परंतू नोंदणी करताना बायोमेट्रिक यंत्रावर बोटांचे ठसे न उमटणे, इंटरनेटची स्पीड कमी असणे यामुळे ग्रामीण भागात नोंदणी करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.