गडचिरोली : सध्या मोतीबिंदू, बुबुळाला फूल पडणे आणि दृष्टिदोष या समस्या वाढल्या आहेत. छोट्या उद्योगधंदामुळे डोळ्यांच्या जखमांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे स्पंदन फाऊंडेशन आणि लॉयन्स क्लब गडचिरोली, तसेच लॉयन आय सेंटर सेवाग्राम (वर्धा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गडचिरोलीत केले होते. त्यात 25 ते 30 गावातील 195 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातून मोतीबिंदू असलेल्या 49 रुग्णांना सेवाग्राम येथे शस्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्पंदन फाऊंडेशनचे पदाधिकारी डॅा.पंकज सकिनलावार, डॅा.प्रिया सकिनलावार, डॅा.धम्मदिप बोदेले, डॅा.सौरभ नागुलवार, तसेच लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष मंजुषा मोरे, सचिव नितीन चंबुलवार, कोषाध्यक्ष गणेश परदेशी, संस्थापक अध्यक्ष नारायण पद्मावार, झोन चेअरपर्सन दीपक मोरे, कॅबिनेट ऑफिसर डॅा. सुरेश लडके, शेषराव येलेकर, शांतीलाल सेता, नितीन बट्टूवार, पुरुषोत्तम वंजारी, शेमदेव चापले, किशोर चिलमवार, मदत जीवानी, सपना बोरेवार , शालिनी कुमरे, वंदना चापले आदींनी परिश्रम घेतले.
मोतीबिंदू टाळण्यासाठी हे करा
मोतीबिंदू होऊ नये म्हणून काही उपाययोजना करायला हव्यात. त्यात जेवणात लसूण भरपूर असावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या देशात उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळ्यावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण एक चांगला प्रतिबंधक उपाय आहे. संगणक व टी.व्ही च्या किरणांमुळे मोतिबिंदू लवकर होतो.