गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 91 हजार 432 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने अवघा एक रुपया हप्ता भरलेला असला तरी विम्याची उर्वरित रक्कम शासनाने भरली आहे. यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे गडचिरोली जिल्ह्यातून एकूण 32 कोटी 88 लाख रुपयांचा हप्ता भरण्यात आला. पण विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी अवघे 2 कोटी 38 रुपये मंजुर करत 30 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पीक विम्याची योजना शेतकऱ्यांच्या फायद्याऐवजी विमा कंपनीचा गल्ला भरणारी ठरली आहे.
खरीप हंगामातील पीकांच्या नुकसानीपोटी यावर्षी 6352 शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसानीसंदर्भात कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे दावे केले होते. त्यापैकी अर्ध्याच, म्हणजे 3097 शेतकऱ्यांचे दावे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ग्राह्य धरण्यात आले. त्यापोटी जेमतेम 2 कोटी 38 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे सदर विमा कंपनीने मान्य केले आहे. नुकसानभरपाईसाठी दावे करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांच्या मंडळात 25 टक्केपेक्षा जास्त नुकसानभरपाई झाले आहे का याची तपासणी करण्याचे काम केले जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. हंगाम संपून बरेच दिवस झाले असताना अद्याप त्याचा हिशेब जुळविण्याचे काम कंपनीने पूर्ण करण्यात आलेले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे ज्या 3097 शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे दावे मान्य केले त्यांना अद्याप भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शिल्लक असलेल्या उर्वरित दाव्यांची पडताळणी झाल्यानंतरच नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात विम्याच्या हप्त्यापोटी कंपनीकडे भरण्यात आलेली रक्कम आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेली भरपाईची रक्कम यात मोठी तफावत आहे. त्यामुळे ही पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीचाच गल्ला भरणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.