गडचिरोली : धान उत्पादक पूर्व विदर्भातल्या गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ६०० राईल मिलर्सचे महाअधिवेशन येत्या शनिवार दि.१८ ला नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा.प्रफुल्ल पटेल, खा.अशोक नेते आणि खा.सुनील मेंढे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी कळविले.
या अधिवेशनात विदर्भ आणि देशासाठी या भागातील तांदूळ उद्योगाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. तसेच यानिमित्ताने देशातील जवळपास १० प्रमुख मशिन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या अत्याधुनिक टेक्नॅालॅाजीयुक्त मशिनरींचे प्रदर्शन करणार आहेत.
पूर्व विदर्भात धानाचे वर्षाकाठी जवळपास ५५ ते ६० लाख टन उत्पन्न होते. या भागातील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान आहे. त्यावर आधारित राईस मिल उद्योगातून ५० हजार कामगारांना प्रत्यक्ष तर २० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचा दावा राईस मिलर्स असोसिएशनने केला आहे. दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांच्या तांदूळ उत्पादन आणि विक्रीमुळे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे.
धान्यांची आधारभूत किंमत केंद्र शासन ठरवून ती सर्व राज्यांसाठी सारखीच लागू करते. परंतू त्यासाठी पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये होणाऱ्या धान उत्पादनाचे निकष लावले जातात. वास्तविक त्या भागात सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे इतर भागाच्या तुलनेत तिथे उत्पादन जास्त होते. महाराष्ट्रात धानापासून ६७ टक्के तांदूळ केंद्र सरकारच्या मापदंडानुसार मिळत नाही. त्यामुळे मिलिंग इन्सेन्टिव्ह मिळत नाही, याकडे राजकीय नेतेमंडळींचे लक्ष वेधले जाणार आहे. याशिवाय धानावरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले जाणार आहे.