मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तो युवक स्वत:च बुडाला, मृतदेह सापडला

डोंग्यासोबत ड्रोनने घेतला वैनगंगेत शोध

चामोर्शी : आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी जाणे एका युवकाच्या जीवावर बेतले. विशेष म्हणजे पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी तो पुढे सरसावला. यात बुडणारा मित्र तर बचावला. पण त्याला वाचविण्यासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाला. तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह भेंडाळा परिसरात सापडला. करण गजानन गव्हारे (२५ वर्ष) असे त्याचे आहे. यामुळे एेन दिवाळीच्या सणात कुनघाडा (रै) गावावर शोककळा पसरली.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथील युवक करण गव्हारे हा दिवाळी सणाच्या पर्वावर एटापल्लीवरून स्वगावी कुनघाडा येथे आला होता. दि.१३ ला १२ मित्र गावाशेजारी असलेल्या वैनगंगा नदीघाटावर आंघोळ करायला गेले. त्यापैकी तीन मित्र तिथे ठेऊन असलेल्या डोंग्यावर बसले. पण डोंग्यात पाणी शिरू लागल्याने एका मित्राने पाण्यात उडी घेतली. तो पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून पाण्याबाहेर असलेला करण त्या मित्राला वाचवायच्या खोल पाण्यात गेला. त्याचा मित्र कसाबसा बाहेर आला, पण करण मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

चामोर्शी ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी नदीत नावेने फिरून आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने करणचा शोध घेतला. दोन दिवसांनतर १५ नोव्हेंबरला पहाटे एका मच्छिमाऱ्याला त्याचा मृतदेह तळोधी नदी परिसरात दिसला.

विशेष म्हणजे करण आई-वडीलांना एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई-बाबा, आजी-आजोबा व एक विवाहित बहीण आहे.