गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील उन्हाळी परीक्षेत गोंडवाना विद्यापीठाचा निकाल ७५.२६ टक्के लागला. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या १८ हजार ५५६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी विद्यापीठाने यावर्षीच्या (२०२३-२४) शैक्षणिक सत्रासाठी कॅरी फॅारवर्ड पद्धत लागू केली आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण होऊनही त्यांना नवीन सत्रात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
उन्हाळी २०२३ मधील परीक्षेला एकूण ७५ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५६,४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १८,५५६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागणार होते. पदवी व उच्चशिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढून अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांविना ओस पडणार होती. त्यामुळे विद्यापीठाने सत्र २०२३-२४ करिता कॅरी फॅारवर्ड पध्दती लागू करून सदर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिलेली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले.
दरम्यान उत्तीर्ण-अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातील आकडे चुकीचे असून त्यामुळे विद्यार्थी, पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले.