…तर गोंडवानाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन होणार

उन्हाळी परीक्षेतील गुणांकनात गडबड?

गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेच्या निकालात काही विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे अतिशय कमी गुण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला असून गुणांकन देताना कुठेतरी गडबड झाली, असा विद्यार्थ्यांचा संशय आहे. त्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी तातडीने बोलविलेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांनी गुणदानाबाबत तक्रारी केलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह बोलावून त्यांना त्यांच्या लिखित उत्तरपत्रिका गोंडवाना विद्यापीठ, विद्यार्थी सुविधा केंद्र चंद्रपूर तसेच ब्रम्हपुरी, वरोरा, आरमोरी, अहेरी, चिमुर येथील संलग्नित महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात येतील. विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणदानामध्ये तफावत आढळून आल्यास एकूण तक्रारकर्त्या विद्यार्थी संख्येच्या १० टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करण्यात येईल. त्यामध्ये चुकीचे गुणदान झाल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण तक्रारकर्त्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांचे पुनश्च मुल्यांकन करण्यात येईल.

पुनर्मुल्यांकनामध्ये एखाद्या विषयामध्ये १० टक्केच्या वर गुण वाढत असतील तर अशा विद्यार्थ्याचे पुनर्मुल्यांकन भरलेले शुल्क परत करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. पुनर्मुल्यांकनासाठी प्रतीविषय रु ५०० प्रमाणे शुल्क विद्यापीठाद्वारे आकारले जाते. परंतु विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची परीस्थिती लक्षात घेता पुनर्मुल्यांकनासाठी प्रतीविषय रु ३०० प्रमाणे शुल्क आकारण्याचे ठरले. पण सदर विषय अंतिम निर्णयासाठी व्यवस्थापन परीषदेच्या मान्यतेसाठी ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

याशिवाय पुनः मुल्यांकनासाठी दोन विषयाऐवजी जास्तीत जास्त तीन विषयांकरीता अर्ज करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.