वनरक्षकांविना सांगा कसे होणार गडचिरोलीतील वनांचे रक्षण?

२०० वनरक्षकांच्या जागा रिक्त

गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात आली आहे. कारण या वनांचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या २०० वनरक्षकांच्या जागा आजच्या स्थिती रिक्त आहेत. त्यामुळे एका वनरक्षकाला दोन ते तीन बिटची जबाबदारी देण्यात आली आहे. तब्बल ८ ते ९ हजार चौरस हेक्टरचे जंगल एका वनरक्षकाने सांभाळायचे तरी कसे? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने उपस्थित केला आहे.

प्रत्येक वनरक्षकाकडे असलेले तीन ते साडेतीन हजार चौरस हेक्टर वनक्षेत्र कमी करून ते एक हजार ते बाराशे चौरस हेक्टर करावे आणि वनरक्षकांच्या सर्व रिक्त जागा भराव्या, अशी मागणी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी बुधवारी गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्याकडे केली. यावेळी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस अरुण पेंदोरकर, संघटक नितीन गडपायले, सिद्धार्थ मेश्राम, किशोर सोनटक्के हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. वनसंरक्षक रमेशकुमार यासंदर्भात सकारात्मक असल्याचे यावेळी पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यात वनतस्करांकडून रात्रीच्या अंधारात नदीमार्गे मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी होत असते. अलिकडे वाघांची संख्या वाढल्यानंतर वाघांची शिकार करणारी टोळीही जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघडकीस आले. परंतू वनरक्षकांच्या रिक्त जागा आणि त्यांच्यावरील कामांचा ताण पाहता अतिसंवेदनशिल गडचिरोली जिल्ह्यातील जंगल तथा त्यातील प्राण्यांचे रक्षण व्यवस्थित होऊ शकेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.