देसाईगंज : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत नागरिकांना रेशनच्या दुकानातून ई-पॅास मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात येते. परंतु मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे दुकानदारांना ई-पॅास मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करताना समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे जुलै महिना संपत आला तरी नागरीकांना अन्नधान्य मिळालेले नाही. पण आता ई-पॅास मशिनशिवाय, म्हणजे ऑफलाईन अन्नधान्य पुरवठा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आ.कृष्णा गजबे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने आणि रोजगाराची साधने अपुरी असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र ई-पाॅस मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना अन्नधान्याअभावी उपासमारीची पाळी ओढवण्याची शक्यता असल्याचे आमदार कृष्णा गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे दुकानदारांना ऑफलाईन अन्नधान्य पुरवठा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. सदर मागणीच्या अनुषंगाने दि.30 जुलैला रास्त भाव दुकानदारांना ऑफलाईन अन्नधान्य वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.
रास्त भाव दुकानदारांनी शासन परिपत्रक व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सुचनेनुसार जुलै 2024 चे अन्नधान्य नागरिकांना वाटप करण्याचे आवाहन करण्यात आले. जलद प्रतिसाद देत नागरिकांच्या समस्येचे शासनाने निराकरण करुन दिलासा दिल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्न, नागरी पुरवठा मंत्री यांच्यासह विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.