भोई, ढिवर व गोपाळ समाजबांधवांना मिळणार मुक्त वसाहत घरकुलांचा लाभ

आ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने भोई, ढिवर व गोपाळ या भटक्या जमातीचे वास्तव्य आहे. परंतू हा समाज हक्काच्या घरापासून वंचित राहात होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांनाही घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले, अखेर त्या प्रयत्नांना यश आले असून शासकीय स्तरावरुन तसे परिपत्रक काढण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरीकांना हक्काचे घर मिळावे याकरीता इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरमोरी तालुक्यात 52, देसाईगंज तालुक्यात 100, कुरखेडा तालुक्यात 23 लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील एकुण 440 नागरिकांनी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर केले होते. परंतु जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. ही बाब निदर्शनास येताच आमदार कृष्णा गजबे यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली यांना अर्जांची छाननी करून पात्र अर्जांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय समितीच्या प्रशासकीय मान्यता आदेशासह पंचायत समितीनिहाय 440 लाभार्थ्यांची यादी शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आली.

सदर प्रस्तावास मंजुरी देण्याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची पत्राद्वारे विनंती केली. त्यानुसार ना.सावे यांनी उपसचिवांना त्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश दिले. त्या अनुषंगाने 24 सप्टेंबर 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी आमदार गजबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे आभार मानले.