गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या धडकेने मृत्यू ओढवलेल्या दुर्गेश नंदनवार यांच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे केलेला दावा फेटाळण्यात आला होता. अखेर शनिवारी (दि.14) राष्ट्रीय लोकन्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार टाटा एज (एआयजी) जनरल इन्शुरन्स कंपनीने मृताच्या वारसांना 1 कोटी 15 लाखांची नुकसानभरपाई दिली.
प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये गडचिरोली पोलीस स्टेशनसमोर झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुर्गेश नंदनवार यांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत मोटार अपघात दावा प्राधिकरण गडचिरोली यांच्या न्यायालयात नंदनवार यांच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. त्यात 1 कोटी 78 लाखांच्या भरपाईची मागणी केली होती. पण टाटा एज जनरल इन्शुरन्स कंपनीने तो दावा फेटाळला होता. दरम्यान नंदनवार यांच्या कुटुंबियांनी दि.14 ला गडचिरोलीत झालेल्या लोकन्यायालयात दाद मागितली.
अखेर या दाव्याविषयी विमा कंपनी आणि अर्जदारांमध्ये लोकन्यायालयात समझोता करण्यात आला. त्यानुसार विमा कंपनीने अर्जदारांना नुकसानभरपाईपोटी 1 कोटी 15 लाख देण्याचे मान्य केले. मोटार अपघात दाव्यात गडचिरोलीत पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम देण्यास कंपनी तयार झाली. या रकमेपैकी मृत दुर्गेश नंदनवार यांच्या 4 वर्षाचे अज्ञान मुलाला 40 टक्के रक्कम तो सज्ञान होईपर्यंत मुदत ठेव स्वरूपात दिली जाणार आहे. याशिवाय पत्नीला 30 टक्के, तर आई-वडिलांना 30 टक्के रक्कम देण्याचे ठरले.
हे प्रकरण तडजोडीकरीता ज्या पॅनलवर ठेवलेले होते, त्याचे पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर.सित्रे व पॅनल सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दीपा गावडे होत्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत बा. कुलकर्णी आणि प्राधिकरणचे सचिव आर.आर. पाटील यांच्या हस्ते मृतांच्या वारसांना इन्शुरन्स कंपनीच्या वतीने भरपाईच्या रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रकरणात मृत नंदनवार यांच्या वारसदारांच्या वतीने अॅड.एल.बी. डेकाटे आणि इन्शुरन्स कंपनीच्या वतीने अॅड.राजेश ठाकूर यांनी कामकाज पाहिले.