गडचिरोली : राज्यात नव्याने पुन्हा सत्तारूढ झालेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी रविवारी संध्याकाळी नागपूरच्या राजभवनात पार पडला. यात गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या धान उत्पादक चार जिल्ह्यात कोणालाही मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे धर्मरावबाबांना एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद देणार, की अडीच वर्षानंतर मंत्र्यांची खांदेपालट करून मंत्रीमंडळातच संधी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या संघर्षानंतर अहेरीतून बाजी मारणारे धर्मरावबाबा आत्राम यांनी आतापर्यंत चार वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी 8 विधानसभा निवडणुकांपैकी 5 निवडणुकांमध्ये विजय मिळवला. यावेळचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यात 3 वेळा राज्यमंत्री म्हणून तर गेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळालेले ते एकमेव लोकप्रतिनिधी ठरले. यावेळीही ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील अशी सर्वांना आशा होती. याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीचा तर धर्मरावबाबांना फटका बसला नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री कोण?
गडचिरोलीसह लगतच्या एकाही जिल्ह्यांना मंत्रीमंडळात स्थान नसल्याने गडचिरोलीचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जिल्ह्यातील विद्यमान आणि आगामी काळात येऊ घातलेले खाण व त्यावर आधारित इतर उद्योग पाहता मोठा महसूल देणारा जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेण्याचा मोह गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही आवरता आला नाही. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.