गडचिरोली : अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्लीपर्यंतचा रस्ता खराब झाल्याने एसटीच्या बसगाड्या उशिराने पोहोचत होत्या. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत होता. त्यामुळे लॅायड्स मेटल्स कंपनीने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांची गैरसोय आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही मोफत बससेवा सुरू केली आहे. कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी किंवा संघटनांनी याचे श्रेय घेण्यासाठी कांगावा करू नये, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या वतीने ही बससेवा सुरू केल्यानंतर याचे श्रेय परिसरातील विविध राजकीय पुढारी तसेच राजकीय पक्ष, संघटना घेत असून आपल्यामुळेच ही बससेवा सुरू केल्याचा कांगावा सोशल मीडियामधून करत असल्याचे दिसून येते. मात्र तसे काही नसून सामाजिक दायित्व जोपासत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कंपनीने ही सेवा सुरू केली आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
लॉयड्स मेटल्सने जनतेच्या हितासाठी आतापर्यंत विविध कामे केली असून परिसरातील विद्यार्थ्यांनाही विविध शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले आहे. त्याचा प्रत्यय या परिसरातील नागरिकांना वेळोवेळी आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी यापूर्वी कंपनीने अनेक उपक्रम राबविले असून पुढेही राबविले जातील, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.