राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

गिट्टी-मुरूमाऐवजी मातीची भरण

सिरोंचा : येथील नगरम टी-पॅाईंटपासून कालेश्वर पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 24 कोटी रुपयांच्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यावरील पुलाचे काम पूर्ण होत असताना पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्ता जोडण्यासाठी गिट्टी आणि मुरूमाची भरण टाकण्याऐवजी उखडलेल्या डांबरी रस्त्याच्या पोपड्यांसह मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर येथील एका नामांकित बांधकाम कंपनीला हे काम मिळाले आहे. जवळपास एक वर्षापूर्वी छत्रपती चौकापासून कामला सुरूवात झाली. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर एका पुलाचे काम पुर्ण होत आले आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजुला माती आणि खोदलेल्या जुन्या डांबरी रस्त्याचे पोपडे टाकून भरण दिली जात आहे. वास्तविक त्यात गिट्टी आणि मुरूम भरल्याशिवाय हे काम चांगल्या दर्जाचे होणार नाही. या निकृष्ट साहित्यामुळे पुलावर दोन्ही बाजुने खड्डे पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पैसे वाचविण्याच्या नादात कंत्राटदार कंपनीकडून सुरू असलेल्या या निकृष्ट कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन कॅालला प्रतिसाद दिला नाही. अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने कामाचा दर्जा निकृष्ट ठेवून सरकारी पैशाची होत असलेली ही लूट थांबविण्याची मागणी केली जात आहे.