
गडचिरोली : चातगावच्या सर्च हॉस्पिटलमध्ये 19 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत जयपूर फूट शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार उपकरणांचे मोफत वितरण केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हे या शिबिराचे उद्दीष्ट आहे.
यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या काठ्या, कुबड्या, व्हिलचेअर्स आणि श्रवणयंत्रे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना या शिबिराचा मोठा फायदा होणार आहे. दिव्यांगतेमुळे अनेक लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्च हॉस्पिटल आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या सहकार्याने या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने या उपकरणांसाठी मोजमाप, बनावट, फिटिंग आणि वितरण करण्यात येणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि स्वतःचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासनाचे, स्वयंसेवी संस्थांचे आणि नागरिकांचे सहकार्य घेतले जाणार आहे.