मेडीगड्डाबाधित शेतकऱ्यांना मिळणार २६ कोटींची मदत

खासदार अशोक नेते यांची माहिती, प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांसोबत केली चर्चा

असरअल्ली मार्गातील अडथळ्यांसंदर्भात उपोषण मंडपातून अधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना खा.अशोक नेते.

सिरोंचा : येथील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करणाऱ्या मेडीगड्डा प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांची खासदार अशोक नेते यांनी भेट घेतली. मेडीगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतजमिनीची आणि पिकांची हाणी झालेल्या १२८ हेक्टर क्षेत्राच्या मालकांना, अर्थात ३५० शेतकऱ्यांसाठी २६ कोटींची मदत मंजूर झाली आहे. त्यापैकी ११ कोटी ८ लाख रुपयांचा निधी आलेला आहे.येत्या २० ते २५ दिवसांत जिल्हाधिकारी नियोजन करुन तो निधी बाधित शेतकऱ्यांना वितरीत करतील. याशिवाय मेडीगड्डा प्रकल्पामुळे पुन्हा वाहून गेलेल्या, प्रकल्पाच्या खालच्या आणि वरच्या भागातील शेतजमिनीचा तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारकडून लवकरच संयुक्त सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सिरोंचा-असरअल्ली रस्त्याची समस्या मांडून ही समस्या सोडविण्याची मागणी केली. खा.नेते यांनी लगेच जिल्हाधिकारी संजय मिना आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून रस्त्याच्या बांधकामाला गती देण्याची सूचना केली. या रस्त्याच्या बांधकामातील अडथळे दूर करून हे काम लवकर सुरू केले जाईल, असा विश्वास खासदारांनी उपोषणकर्त्यांना दिला.

यावेळी खा.नेते यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांना सदर प्रभावित झालेले काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे असरअल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग ६३ चे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास नेते यांनी उपोषणकर्त्यांना दिला. यावेळी उपोषणकर्ते सुरज दुदी, रामप्रसाद रंगुवार, तिरुपती मुद्दाम, विशाल रंगुवार, श्रीनिवास रंगुवार आदींसह भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेलवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंपलीवार, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, इंजिनिअर नितिन बोबडे, इंजिनीअर सारंग गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शुगरवार, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजेश संतोषवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन दशकानंतर होणार असरअल्ली मार्गाचे काम
तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६३ हा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मुख्यालयातून जाते. दोन दशकांपूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग १६ म्हणून ओळखला जात होता. आता हाच महामार्ग ६३ म्हणून ओळखला जात आहे. या रस्त्याचे बांधकाम दोन दशकांपूर्वी सीमा सडक संघटनेने (बी.आर.ओ.) केले होते. तेव्हापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. असे असले तरी मागील काही वर्षांपासून या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत आहे. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी समोर करून काम थांबविण्यात आल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी खा.नेते यांच्याकडे केली.