मेडीगड्डामुळे उद्भवलेल्या समस्यांवर मुंबईत सोमवारी सचिवस्तरीय बैठकीचे आयोजन

खा.नेते यांच्या पुढाकाराने होणार चर्चा

गडचिरोली : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा जलप्रकल्पाचा फटका गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तोडगा काढण्यासोबत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, नागरिकांचे आवागमन यावर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१२) मुंबईत सचिवस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. खासदार अशोक नेते यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक लावली आहे.

या बैठकीला महाराष्ट्रासह तेलंगणा सरकारचे सचिवही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत गोदावरी, प्राणहिता नद्यांच्या बॅकवॅाटरमुळे पाण्याखाली जाणाऱ्या शेतीमुळे होणारे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या भागाचे पुनर्वसन, सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आवागमनाची गैरसोय दूर करणे आणि नागरिकांना विशेष सुविधा देणे अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते यांच्यासह प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे खा.नेते यांच्या कार्यालयाने कळविले.