महसूलमंत्री विखे पाटलांनी शेताच्या बांधावर जाऊन केली पीक पाहणी

खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत घेतला आढावा

चिमूर : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते, आ.कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी रविवारी चिमूर तालुक्याचा दौरा केला. तालुक्यातील वहाणगांव (बो.), बोथली व रेंगाबोडी या गावांना भेटी देऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, कापूस व इतर पिकांची पाहणी केली. यानंतर अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नुकसानभरपाईसाठी दिरंगाई न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

सर्वप्रथम शेडेगाव व खडसंगी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. वहाणगाव (बो.) येथे भेटीदरम्यान भाजपा ओबीसी आघाडीचे चिमूर तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ना.विखे पाटील यांच्यासह खासदार नेते व आ.बंटी भांगडिया यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, भगवी टोपी आणि ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांसोबत विविध समस्यांसंदर्भात अर्ज/निवेदने स्वीकारून त्यांना आश्वस्त करण्यात आले.

पंचायत समितीत आढावा बैठक

चिमूर पंचायत समिती सभागृहात जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध महत्वपूर्ण विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला. या बैठकीदरम्यान खासदार नेते यांनी घरकुल बांधकामामध्ये रेती हा महत्त्वाचा घटक असून या रेतीमुळे अनेक घरकुलांचे बांधकाम रखडलेले आहे. रेतीही महाग असल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला, गरीब व्यक्तीला घरकुल बांधकामात रेती खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे राज्यातील संपूर्ण घरकुलधारकाना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

या बैठकीला प्रामुख्याने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी मुरुगनाथम, अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे, उपविभागीय अधिकारी चिमूर किशोर घाडगे, एसडीपीओ राकेश जाधव, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, न.प.मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड यांच्यासह इतर अधिकारीगण उपस्थित होते.