नक्षली हल्ल्यात शहीद 16 पोलिस जवानांच्या स्मृतिंना मिळाला उजाळा

छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात उभारले स्मारक

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 14 वर्षांपूर्वी, म्हणजे 2009 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यासह 16 जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ भामरागड तालुक्यात शहीद स्मारक उभारण्यात आले. गडचिरोली मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड सिमेलगतच्या अतिदुर्गम भागात हे स्मारक आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते रविवारी या शहीद स्मारकाचे अनावरण करण्यात आले.

8 ऑक्टोबर 2009 रोजी नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये गडचिरोली पोलिस दलाच्या एका पोलिस अधिकाऱ्यासह 16 जवान शहीद झाले होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, त्या लाहेरी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात हे स्मारक उभारण्यात आले आहे.

त्या शहीद जवानांचे बलिदान इतर पोलिस आणि जनतेच्या कायम स्मरणात राहावे, तसेच त्यांच्या कार्याला सतत आठवणीत ठेवून इतर अधिकारी/ जवानांना प्रेरणा देण्याकरीता लाहेरी येथे हे शहिद स्मारक उभारण्यात आले.

आम्ही आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांचे स्वागत करत आहोत. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन करत माओवाद्यांच्या जाचाला आता घाबरण्याची गरज नसून, गडचिरोली पोलिस दल तुमच्या संरक्षणासाठी व विकासासाठी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही यावेळी पो.अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित नागरिकांना उद्देशून दिली. पोलिस दल आपल्या सर्व अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख, सीआरपीएफ बटालियन 37 चे कमांडंट खोब्रागडे, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आश्रमशाळा लाहेरीचे शिक्षकवृंद व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपपोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोउपनि प्रशांत डगवार, अभिजीत काळे, सचिन सरकटे व सर्व अंमलदार, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अशोक कुमार, निरीक्षक शीतला प्रसाद तसेच एसआरपीएफ ग्रुप 07 चे अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.