खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी एटापल्लीत घेतली आढावा बैठक

6 महिन्यांत समस्या सोडवण्याचे निर्देश

एटापल्ली : दक्षिण गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेले खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी एटापल्ली येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. यावेळी सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना खा.डॉ.किरसान म्हणाले, दुर्गम भागातील जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नाही. शासनाच्या योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठी तात्काळ कृती हवी आहे. प्राथमिक स्वरूपाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात आणि उर्वरित सर्व समस्या येत्या 6 महिन्यांच्या आत निकाली काढाव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, एटापल्ली नगरपंचायतीच्या अध्यक्ष दिपयंती पेंदाम, काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष हनुमंतु मडावी, अनुसूचित जाती विभाग सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश गंपवार, अहेरी तालुकाध्यक्ष पप्पू हकिम, काँग्रेसचे पदाधिकारी मुस्ताक हकीम, लोकेश गावडे, प्रज्वल नागूलवार यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व प्रमुख विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मागण्यांवर आधारित योजना आणि पुढील कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये विकास कामांचा प्रगती अहवाल, शासकीय योजना राबवण्याची गती, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि येणाऱ्या अडचणी यांचा समावेश होता.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून येत्या काळात एटापल्ली तालुका अधिक सक्षम आणि सुविधा संपन्न होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.