राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या निकाली काढण्यासाठी घेतली गडकरींची भेट

खा.डॉ.नामदेव किरसान यांनी दिले निवेदन

गडचिरोली : केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान डॅा.किरसान यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली.

प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्र.353-C (वडसा-गडचिरोली ते आष्टी-सिरोंचा) चे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने व महामार्गावर मोठे खड्डे पडले असल्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आष्टी- अहेरी -सिरोंचा मार्गांवरील बस आणि खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यांच्या आरोग्याच्या आणि प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. महामार्गावरील पुलांची उंची फार कमी असल्याने सतत पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. सदर महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच सिरोंचा- आष्टी आणि गडचिरोली- आरमोरी महामार्गांवर मोठे खड्डे पडले असल्याने त्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचीही मागणी केली. यावेळी ना.गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय महामार्ग क्र.543 चे (देवरी- कोरची – कुरखेडा -वडसा )- काम संथगतीने चालू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग क्र.353-D, (नागभीड ते उमरेड) नागपूरला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गचे काम पूर्ण झाले नाही ते त्वरित पूर्ण करण्यात यावे व या महामार्गांवर वाहतूक वाढली असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्ग क्र.NH 353- C ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 ला जोडणाऱ्या चामोर्शी -मूल राज्य महामार्गांवर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्त्याचे काम करण्यात यावे. 1980 च्या वन कायद्यात शिथिलता आणून ही कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी खा.किरसान यांनी केली
(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)