गडचिरोली : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी अनखोड येथे हमीभाव कापूस खरेदी केंद्र मंजूर करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक अतुल गण्यारपवार यांनी केली होती. त्यासाठी शुक्रवारी (दि.27) आष्टीत चक्काजाम आंदोलनही करण्याचे प्रस्तावित होते. मात्र अनखोडा येथे हे केंद्र मंजूर करीत असल्याचा संदेश गण्यारपवार यांना आल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. याशिवाय चामोर्शी येथेली कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रक्रिया राबवत असल्याची माहिती सीसीआयच्या उपमहाव्यवस्थापकांनी कळविली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र कुठेही नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील कापूस खरेदीदार गडचिरोली निल्ह्यात येऊन येथील कापुस उत्पादक शेतकऱ्यांकडून 6000 ते 6400 प्रतिक्विंटलच्या दराने खरेदी करीत आहेत. लगतच्या चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव कापुस खरेदी केंद्रावर 7500 रुपये दराने खरेदी सुरु आहे. म्हणजेच गडचिरोली जिल्हयातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्विंटल एक ते दिड हजार रुपयांनी लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी शासनाचे हमीभाव कापुस खरेदी केंद्र अनखोडा येथे मंजुर करुन चालू करण्याकरीता सीसीआय अकोला विभाग तथा महाराष्ट्र कापूस महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फतही सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु बाहेरच्या जिल्ह्यातील कापुस जिनिंग मालकांकडून गडचिरोली जिल्हयात शासनाचे कापूस खरेदी केंद्र मंजूर होऊ नये याकरीता प्रयत्न चालू असल्याने गडचिरोली जिल्हयात आतापर्यंत शासनाचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र मंजुर झाले नव्हते. त्यामुळे अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याची तयारी सुरू होती.
दरम्यान सीसीआय अकोलाचे महाव्यवस्थापक निरज कुमार यांनी अतुल गण्यारपवार यांना अनखोडा येथे शासनाचे हमीभाव कापुस खरेदी केंद्र मंजुर झाल्याचे मोबाईल संदेशातून कळविले. येत्या 4 ते 5 दिवसात हे केंद्र मंजुर चालू न झाल्यास पुन्हा त्याच ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा गण्यारपवार यांनी दिला आहे.