गडचिरोली : गडचिरोली शहरातून चारही बाजुने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रहदारीला अडचण होते. ही अडचण दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 14 किलोमीटरच्या बायपास (रिंग रोड) मार्गाचे काम सुरू होणार आहे. हे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले होते. त्यानुसार जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली.

गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यानंतर आणि चारही दिशेने महामार्गाचे काम मार्गी लागल्यानंतर वाहतूक वाढली आहे. रस्ता मोठा झाला असला तरी नागरिकांकडील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जड वाहनांची वाहतूक शहरी भागातील नागरी वस्तीतून न होता ती बायपास मार्गाने होण्यासाठी शहराच्या चारही बाजुने बायपास मंजूर करण्यात आले आहेत. त्यात गोगाव ते लांझेडा, लांझेडा ते सेमाना, सेमाना ते नवेगाव आणि नवेगाव ते गोगाव असा या बायपासचा मार्ग राहणार आहे. यातील सेमाना ते नवेगावपर्यंतच्या मार्गाचे काम झाले आहे. मात्र उर्वरित मार्गांचे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी यासंदर्भात बैठक घेतली. त्यात या बायपास मार्गांसाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कठाणी व शिवणी नदीवरील रस्त्यांची दुरूस्ती करा
नागपूर मार्गावरील कठाणी नदीवरच्या पुलाला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असल्याने हे काम तातडीने करून नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच चामोर्शी मार्गावरील शिवणी नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचेही काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय चामोर्शी मार्गावरील रस्ता दुभाजकावरील पथदिवे सुरू करणे, गडचिरोली टी-पॅाईंट ते पोस्ट आॅफिसपर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करणे आणि कंत्राटदार व महावितरण यांच्या समन्वयातून राष्ट्रीय महामार्गावरील विद्युतीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले आहेत.
































