कोरची : जिल्ह्याच्या उत्तर टोकावरच्या कोरची या तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या कार्यालयातील एक भलताच प्रकार समोर आला आहे. या कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यानेच त्याबाबत सांगितल्यामुळे त्यावर तूर्त तरी विश्वास ठेवावा लागणार आहे. पण या प्रकाराबाबत अद्याप जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कानोकान खबर नसणे, हेसुद्धा एक आश्चर्य आहे. आता याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनाच शहानिशा करून हा प्रकार खरा आहे का, याची शहानिशा करून अॅक्शन घ्यावी लागणार आहे.
कोरची येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. पण हे कार्यालय नामधारी असून प्रत्यक्षात अधिकारी-कर्मचारी कुरखेडा येथूनच कारभार पाहात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने सहजपणे बोलताना ही कबुली दिल्यामुळे ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. सोमवारी हा सर्व प्रकार कॅमेराबद्धही झाला. पण दररोज असे होत असेल तर हा प्रकार गंभीर ठरणार आहे.
वास्तविक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे सोमवारी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे गरजेचे असते. मात्र गेल्या सोमवारी (दि.९) कोरचीतील जि.प.बांधकाम उपविभागाचे कार्यालयच ११ वाजेपर्यंत उघडलेले नव्हते. जवळपास ११.१५ च्या सुमारास चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिलेने कुलूप उघडले. कार्यालयात कोणीच आलेले नसल्यामुळे तिला याबाबत विचारले असता तिने कर्मचारी तर कुरखेड्यात असतात असे सांगून आपल्याच कार्यालयाची पोलखोल केली. या कार्यालयात सहाय्यक अभियंता बी.सी. धार्मिक यांच्यासह जवळपास १५ कर्मचाऱ्यांची संख्या आहे. पण त्यापैकी एक चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता कोणीही उपस्थित नसणे आश्चर्यात टाकणारे आहे.
… म्हणून कर्मचारी उशिरा पोहोचले
यासंदर्भात कार्यालयाचे सहाय्यक अभियंता बी.सी. धार्मिक यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी शासकीय कामाने सोमवारी नागपूरला गेलो होतो. कार्यालयातील लिपिकांची रविवारी सीईओ मॅडमनी गडचिरोलीत लेखी परीक्षा ठेवली होती. तेथून परतताना त्यांची बस हुकल्यामुळे त्यांना मुक्काम करावा लागला. त्यामुळे सोमवारी कोरची येथे कार्यालयात पोहोचण्यास त्यांना उशिर झाला, असे अभियंता धार्मिक म्हणाले. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले तरीही कार्यालयातील चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याने सहजपणे दिलेली माहिती खरी की खोटी, याची शहानिशा करणे गरजेचे आहे.