वनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करून वेधले लक्ष

आंबेशिवणीतील वनरक्षकावर कारवाईची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील आंबेशिवणी येथे वनरक्षकाने नियमांना डावलून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठण करून शासनाच्या योजनेतील लाखोंच्या अनुदानाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्या वनरक्षकावर कायदेशिर कारवाई करण्यासाठी उपसरपंच आणि इतर काही जागरूक नागरिकांनी वनसंरक्षक कार्यालयासमोर बुधवारी ढोल बजाव आंदोलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंबेशिवनीचे वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आंबेशिवणीचे उपसरपंच योगाजी कुडवे आणि काही नागरिकांनी वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात बुधवारी ढोल-ताशे वाजवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी योगाजी कुडवे यांच्यासह रवींद्र सेलोटे, आकाश मट्टामी, नीलकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, विलास भानारकर, विलास धानफोले, रवींद्र धानफोले, अमोल झंजाड, सुनील बाबनवाडे, मोतीराम चंद्रगिरे, मुरली गोडसुलवार, तुळशीराम मेश्राम आदी उपस्थित होते.