वनपट्टेधारक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

विशेष बाब म्हणून गडचिरोलीसाठी सूट

गडचिरोली : खरीप हंगामातील धानाची शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार विक्री करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्या नोंदणीसाठी वनपट्टेधारक शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी आॅनलाईन पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतच मुदत होती. परंतू आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट परिसरातील ज्या वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या याद्या विहित मुदतीत शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्या नाहीत, त्यांनाच ही वाढीव मुदतीची सूट मिळणार आहे.

यासंदर्भात गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांनी शासनाला माहिती दिली होती. त्यानुसार त्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मुदतवाढ दिली जाणार आहे.