आरमोरी मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात कृषिपंपांना आजपासून १२ तास वीज पुरवठा

उपमुख्यमंत्र्यांनी पाळला दिलेला शब्द

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कृषिपंपांना मिळत नसलेला 12 तासांचा वीज पुरवठा पुन्हा पूर्वीप्रमाणे 12 तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने बुधवार, दि.6 पासून केली जाणार आहे. त्यामुळे या समस्येवरून देसाईगंज तालुक्यात उठलेले वादळ शांत होणार आहे.

दुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने जिल्हावासीयांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात सिंचनासाठी नदी, नाले, विहीर व शेतातील बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी खरिप व रब्बी / उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकासह भाजीपाला पिकांची लागवड करतात. परंतु राज्यातील वीज तुटवड्यामुळे 12 तास मिळणारा वीज पुरवठा स्थगित करुन कृषिपंपांना केवळ 8 तास वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील धान व भाजीपाला उत्पादक शेतकरी पाणी उपलब्ध असूनही पुरेशा वीज पुरवठ्याअभावी मोठ्या अडचणीत आले होते.

शेतकऱ्यांनी नुकतीच धान पिकाची रोवणी केली आहे. सद्यस्थितीत हे पिक जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरीता शेतकऱ्यांकडून कृषिपंपांना पूर्ववत दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी होत होती. त्यातूनच शेतकऱ्यांनी देसाईगंज एसडीओ कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.  शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन आमदार कृष्णा गजबे यांचा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यांनी ना.फडणवीस यांचा हवाला देत विजेचा तुटवडा दूर होताच पूर्ववत 12 तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान खा.अशोक नेते यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन ना.फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. एवढेच नाही, तर विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तीन दिवसात निर्णय घ्या, असा अल्टिमेटम शासनाला दिला होता.

सदर मागणीच्या अनुषंगाने देसाईगंज येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन व एकूणच परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे व आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे दि. 4 मार्च रोजी भेट घेतली. त्यांनी 2 दिवसात गडचिरोली जिल्ह्यात 12 तास वीज पुरवठा करण्याचा शब्द दिला. त्याअनुषंगाने आ.कृष्णा गजबे यांनी तातडीने मुंबई गाठत ना.फडणवीस यांची पुनश्च भेट घेतली. त्यावर त्यांनी दि.6 मार्च पासून पुढील आदेशापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपांना पूर्वीप्रमाणे 12 तास वीज पुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले. यामुळे विजेच्या प्रश्नावरून सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे.

आ.गजबे यांनी व्यक्त केली दिलगिरी

शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येचे निराकरण केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच तांत्रिक अडचणींमुळे जवळपास 15 दिवस शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठ्यापासून वंचित रहावे लागले, त्याबद्दल शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली.