गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय, अर्थात दिना नदीवरील प्रकल्पाचा उगम जिथून होतो तेथील नागरिक अजूनही सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. जलाशयाच्या परिसरातील 14 गावांना या धरणाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ‘धरण उशासी आणि कोरड घशासी’ अशी त्यांची स्थिती आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या नेतृत्वात त्या गावांमधील नागरिकांनी यासंदर्भात आवाज बुलंद करत एक निवेदन पाटबंधारे विभागाला दिले.
रेगडीच्या या कन्नमवार जलाशयाच्या लाभक्षेत्रात न येणाऱ्या चेक चापलवाडा, चनकापूर, मकेपल्ली, गोलबंद्री , चापलवाडा, गांधीनगर, वरूर पलासपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, श्यामनगर, सिमुलतला या 14 गावांमधील नागरिक दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून 1982 पासून, म्हणजे 50 वर्षांपासून मागणी करीत आहेत. त्या गावांना दिना प्रकल्पातून सिंचनाची सोय करून देण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणानुसार सदर गावातील भूतलांक दिना प्रकल्पाच्या मुख्य कालवा तलांकापेक्षा वर आहे. त्यामुळे दिना प्रकल्पातून प्रभावी पद्धतीने पाणी देण्यास अडचण येईल आहे, असे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालात म्हटले आहे. परंतु त्यावर तोडगा काढून त्या 14 गावांना पाणी देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अशक्य नाही. त्यासाठी तीव्र ईच्छाशक्ती आणि त्याला प्रयत्नांची जोड द्यावी आणि त्या 14 गावातील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशा मागणीचे निवेदन वरिष्ठांच्या नावे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता संतोष वाकुडकर यांना मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांच्याशी या मागणीबाबत संवाद साधून उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. त्या 14 गावांना योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी त्या लोकांना घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, 14 गावांच्या वतीने गुरुदास पालकवार, दिवाकर भट्टलवार, नवनाथ माधवार यांच्यासह अनेक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.