एकीकडे सूर्य आग ओकतोय, दुसरीकडे विजेअभावी ‘ते’ उकाड्याने उकळतात

एटापल्ली तालुक्यातील शंभरावर गावांना फटका

एटापल्ली : तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या परिघाबाहेरील, तसेच पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र असलेल्याही गावांना सध्या महावितरणच्या अवकृपेचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून शंभरावर गावांमधील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे जवळपास 75 टक्के तालुक्याला दुपारी आणि रात्रीही प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

एकदा वीजपुरवठा खंडीत झाला की पुन्हा कधी सुरू होईल सांगता येत नाही. महावितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या तर जंगलाच्या भाग असल्याने आणि वादळ-वाऱ्यात वीजवाहक तारा तुटत असल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे उत्तर दिले जाते. पण जंगलाच्या भागात वीजवाहक तारा असलेल्या भागातील झाडांच्या फांद्यांची योग्य पद्धतीने कापणी करून वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी महावितरण कंपनीने घ्यायची असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्या देखभालीचा खर्च कागदोपत्री दाखवून अधिकारी पैसे तर खात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

वाढलेले तापमान आणि त्यात गर्मीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वयोवृद्ध, लहान बालके, आजारी नागरिक आणि गरोदर मातांना याचा प्रचंड त्रास होत आहे. वीज पुरवठा नसल्याने घरातील फ्रिज, कुलर, पंखे, मोबाईल, पीठ गिरणी अशी अत्यावश्यक उपकरणेही कुचकामी झाली आहेत. या समस्येवर नागरिकांकडून तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदन देऊन व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार माहिती देण्यात आली. पण प्रशासनाकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या समस्येवर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत नाही.

प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलिस पाटील सादु दुर्वा, माजी सरपंच सादु गावडे, देऊ पुंगाटी, दत्तू उसेंडी, प्रभाकर कुकटलावार, नंदू मट्टामी, देऊ गावडे, दलसू मितलामी व नागरिकांनी केली आहे.